इंदापूर : दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी घराघरांत नवी खरेदी करण्याची लगबग असते. सोनं-चांदी, गाड्या, कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा गजबजलेल्या दिसतात. मात्र ग्रामीण भागातील मुलांसाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत या सणाचे वेगळेच आकर्षण होते. ते आकर्षण म्हणजे सायकलला बसवलेल्या पत्र्याच्या डब्यातून निघणारा ‘बुंग…बुंग…’ आवाज. या खेळामुळे गावोगावी दसऱ्याचा उत्साह द्विगुणित होत असे. मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सच्या युगात मात्र हा खेळ आता हरवून गेला आहे.
दसऱ्याच्या सकाळीच मुले आपापल्या सायकली स्वच्छ धुऊन सजवू लागत. झेंडूची फुले आणि आपट्याची पाने लावून त्या सायकलींना सणासुदीचा साज चढवला जाई. पाठीमागच्या चाकाला काथ्याच्या साहाय्याने पत्र्याचा डबा बसवला की सायकल चालवताना सतत ‘बुंग’ आवाज होत असे. या आवाजामुळे दिवसभर गावभर दसऱ्याचे वातावरण रंगत असे. दहा-पंधरा मुले एकत्र निघाली की संपूर्ण गावात गजर उठत असे.
या खेळाचे वैशिष्ट्य असे की, यात फक्त लहानगेच नव्हे तर वडीलधारी मंडळीही सहभागी होत. पत्र्याचे डबे शोधून देणे, काथ्याने बांधणी करून देणे, मुलांना सायकली चालवायला प्रोत्साहन देणे. यामध्ये मोठ्यांचा उत्साह दिसत असे.
दसऱ्याच्या धार्मिक परंपरा, आपट्याची पाने वाटणे, देवपूजा, रावणदहन, यासोबतच ‘बुंग’ आवाज काढत चालविल्या जाााऱ्या सायकली हा सणाचा अविभाज्य भाग होता. या आवाजाशिवाय दसरा अपूर्ण वाटे. मुलांच्या बुंग सायकलींचा आवाज गावभर घुमला की वातावरणात नवा उत्साह पसरायचा. हा उत्सव सामूहिक स्वरूपाचा असल्याने प्रत्येकजण यातून आनंद घेत असे.
मात्र, गेल्या काही वर्षांत या खेळ काळाच्या ओघात हरवला आहे. मोबाईल फोन, इंटरनेट, सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स यांच्यात गुंतलेल्या आजच्या पिढीला या बुंग आवाजाचे आकर्षण कळत नाही. परिणामी, दहा-पंधरा वर्षांपूर्वी गावोगावी ऐकू येणारा सायकल बुंगाचा आवाज आता विरळ झाला आहे. काही मुलांना हा खेळ माहीतही नाही.
याबाबतच्या आठवणी सांगताना पोलीस हवालदार सतीश चव्हाण म्हणाले, ‘पूर्वीच्या सणांना साधेपणा होता; पण आनंद भरपूर होता. आज साधने आहेत, परंतु निरागस खेळांचा आनंद नाही. दसऱ्याचा बुंग आवाज केवळ आठवणीत राहिला आहे. आमच्या काळात दसऱ्याचा दिवस म्हणजे सायकल बुंग…आवाजाचा दिवस होता. सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही रस्त्यावर असायचो. गावोगावी एकच नाद घुमत असे. आजच्या पिढीला तो आनंद कळणारही नाही.’
‘दसऱ्याच्या निमित्ताने नव्या वस्तूंची खरेदी हा भाग आजही कायम आहे. मात्र, मुलांचा खेळ म्हणून अनुभवलेला बुंग आवाज हा उत्सवाचा आत्मा होता. तो हरवला असल्याने सणाच्या आनंदातली एक निरागस झुळूक हरपली आहे. तरीही ज्या पिढीने तो अनुभवला आहे, त्यांच्या मनात त्या आवाजाच्या आठवणी आजही जिवंत आहेत,’ असेही चव्हाण म्हणाले.
किशोरवयीन अवस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आम्ही दसऱ्याच्या सणाला आवाजाचे जुगाड बसवून सायकल खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याच्या झाडावर चढणे, जांभळाच्या झाडावर चढणे, पंचमीला कबड्डी खेळणे आणि सतत मैदानावर असल्याने पोलीस भरतीमध्ये आम्हाला या खेळाचा फायदा झाला. आम्ही उत्साहाने पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. आज गावाकडे सणावारातून हे खेळ हद्दपार झाले आहेत. जुन्या काळातील आठवणी येतात. – सतीश चव्हाण, पोलीस हवालदार.