पुणे : पुरुषाचे सामर्थ्य आणि चिकाटीबद्दल अनेकदा कौतुक केले जाते. असे असले तरी पुरुष अनेकवेळा एक अदृश्य ओझे वाहत असतात आणि ते क्वचितच व्यक्त होतात. भारतात सुमारे ४० टक्के पुरुष त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल कधीच उघडपणे बोलत नाहीत. महिलांच्या तुलनेत आत्महत्येचे प्रमाण पुरुषांमध्ये जवळपास दुप्पट असल्याकडे मानसोपचारतज्ज्ञांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त लक्ष वेधले आहे.
भावनिक वेदना व्यक्त करण्याबद्दलचा असलेला मानसिक कलंक पुरुषांमध्ये खोलवर रुजलेला आहे. ‘फक्त कमकुवत लोकांना त्रास होतो’ याचबरोबर ‘मानसिक आजार खरे नसतात’ किंवा ‘मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे म्हणजे काहीतरी चुकले आहे’ अशा चुकीच्या समजुतीमुळे पुरुषांना तज्ज्ञांची मदत घेणे आणखी कठीण जाते. पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार यांनी या समस्येवर प्रकाश टाकला. त्यांनी मांडलेले मुद्दे…
जेव्हा शरीर बोलते, पण मन नाही
पुरुष अनेकदा भावनिक ताण – तणाव व्यक्त करत नाहीत. पण त्यांचे शरीर त्याबाबत बोलत असते. याबाबतचे बदल हे बदललेली मनोवृत्ती, भूक, सतत थकवा येणे, डोकेदुखी, आणि पचनाच्या समस्या अशा स्वरूपात दिसू शकते. राग, चिडचिड, आणि आक्रमकता हे दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. मानसिक आरोग्यावर आलेला ताण शारीरिक आरोग्यालाही कमकुवत करतो, त्यामुळे संबंधित व्यक्ती खूप झोप घेते किंवा अगदी कमी झोपते. पण बहुतांश पुरुष हे लक्षणे गंभीरपणे घेत नाहीत आणि यामुळे दीर्घकाळ चालणारी चिंतेची किंवा नैराश्याची ही सुरवातीची लक्षणे असू शकतात. दीर्घकालीन मानसिक ताणामुळे संप्रेरके बदलतात, त्याने पचन बिघडते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, किंवा चयापचय विकार निर्माण होऊ शकतात.
मुखवटा पुरुषत्वाचा : पुरुष वेदना वेगळ्या पद्धतीने कसे व्यक्त होतात?
पुरुष आणि स्त्रिया मानसिक वेदना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात आणि दाखवतात. स्त्रिया दुःख किंवा चिंता उघडपणे व्यक्त करू शकतात, तर पुरुष अनेकदा राग, चिडचिड, अतिश्रम, मद्यपान, किंवा भावनिक अलिप्ततेद्वारे ती व्यक्त करतात. या वेदना कृतीत रूपांतरित करण्याचे मार्ग असतात तसेच संरक्षणात्मक प्रतिक्रिया दिसून येतात. या वेगळ्या अभिव्यक्तीमुळे पुरुषांचे मानसिक आरोग्याचे प्रश्न त्याचे योग्य निदान ही एखादी गंभीर घटना घडेपर्यंत लक्षात येत नाहीत.
शारीरिक परिणाम : जेव्हा ताण शरीराला बदलतो
नियंत्रणाबाहेर गेलेला ताण केवळ मनावर नाही तर शरीरावरही परिणाम करतो. वाढलेला कॉर्टिसॉल (ताण निर्माण करणारे- संप्रेरक) टेस्टोस्टेरॉन कमी करतो. त्यामुळे ऊर्जा, झोप, आणि अगदी प्रजननक्षमताही प्रभावित होते. डॉक्टर आता कमी शुक्राणू संख्या, हार्मोनल असंतुलन, आणि लैंगिक अकार्यक्षमता यांचे वाढते प्रमाण पाहत आहेत, जे दीर्घकालीन ताण आणि चिंतेशी थेट जोडलेले दिसून येतात. सततचा मानसिक ताण मेंदूवरही परिणाम करतो. त्याने एकाग्रता, स्मरणशक्ती, आणि निर्णयक्षमता कमी होते.
नवीन प्रकारचे धोरण : सहन न करू नका, बोला
असुरक्षितता ही कमकुवतपणा नसून ते एक शहाणपण आहे. याबाबत आज जागरुकल वाढत असल्याचे दिसून येत आहे. मदत घेणे, भावना व्यक्त करणे, किंवा मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे हे ‘पुरुषत्वाला शोभत नाही’ असे नसून उलट हीच खरी ताकद आहे. शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच मानसिक तंदुरुस्तीही दैनंदिन सवयींनी राखली जाते. यामध्ये नियमित व्यायाम करून आनंदी करणाऱ्या एंडॉर्फिन्स चे प्रमाण वाढवणे सोडवणे आणि ताण निर्माण करणारे कॉर्टिसॉलचे प्रमाण कमी करणे हे आहे. त्याचबरोबर ७–८ तासांची झोप घेणे यामध्ये मेंदू विश्रांतीत स्वयं:दुरुस्ती करतो. ध्यान किंवा मेडिटेशन करून विचारांना शांत करणे, मेंदूसाठी उपयुक्त ओमेगा-३, बी जीवनसत्त्वे, आणि मॅग्नेशियमयुक्त संतुलित आहार घेणे, भावनिक आधार देणारे मित्र किंवा कुटुंबाचे गट तयार करणे आणि ताण वाढण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घेणे हे आहेत.