पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची एका माथेफिरूने विटंबना केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या घटनेनंतर विविध संस्था, संघटना, तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.
याप्रकरणी सूरज आनंद शुक्ला (वय ३२, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्लाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुतळ्याची विटंबना केली. या घटनेची माहिती प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी शुक्ला याला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतले.
आरोपी शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे. तो पुण्यात रोजगाराच्या शोधात आला होता. आरोपीला रविवारी रात्री अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
काँग्रेसकडून निषेध
घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अरविंदे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन केले. कार्यकर्त्यांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेकही करण्यात आला. ‘रेल्वे स्थानक परिसरातील हा पुतळा शहरातील नागरिकांच्या श्रद्धेशी आणि राष्ट्रीय अस्मितेशी संबंधित आहे. ही केवळ पुतळ्याची विटंबना नसून, पुरोगामी शहराच्या वैचारिक वारशावर आणि सामाजिक सलोख्यावर आघात करणारी घटना आहे,’ असे शिंदे म्हणाले. अभय छाजेड, कमल व्यवहारे, रफिक शेख, अविनाश बागवे, अजित दरेकर आदी या वेळी उपस्थित होते. घटनेची सखोल चौकशी करावी, असे निवेदन पक्षाच्या वतीने पोलिसांना देण्यात आले.
आरोपीकडून न्यायालयाचा अवमान
आरोपी शुक्ला अटक केल्यानंतर सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्ला याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याच्याकडे पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा शुक्ला याने आक्षेपार्ह वक्तव्य करून न्यायालयाचा अवमान केला. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डाॅ. जी. आर. डोरणपल्ले यांनी शुक्ला याला एक हजार रुपये दंड आणि सात दिवस कारवासाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील निलिमा यादव – इथापे यांनी युक्तिवादात केली.
‘आरोपी वेडसर नाही’
आरोपीस कमीत कमी शिक्षा आणि दंड ठोठावण्यात यावा. आरोपी हा वेडसर असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा आरोपी शुक्ला याला अटक केल्यापासून न्यायालयात हजर करेपर्यंत तो वेडसर असल्याचे दिसले नाही, असे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. आरोपी वेडसर असल्याची कोणतीही कागदपत्रे न्यायालयातत दाखल करण्यात आली नाहीत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.