३४ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. राज्य सरकारकडून गावांच्या समावेशाबाबतची अंतिम भूमिका गुरुवारी मुंबई हायकोर्टात मांडली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३४ गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या सुनावणीत सरकार सकारात्मक भूमिका मांडेल अशी चिन्हे आहेत.
पुणे शहरालगतच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याची प्रक्रिया पूर्ण करूनही अंतिम निर्णय घेण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने हवेली नागरी कृती समितीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने ४ मे पर्यंत गावांबाबतचा निर्णय घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. आता गुरुवारी हायकोर्टात काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यास पुणे शहराचे क्षेत्रफळ ४५३ चौरस किलोमीटर एवढे होणार असून पुणे आता मुंबईहून मोठे होईल. मुंबई महापालिकेचे क्षेत्रफळ आता सुमारे ४५० चौरस किलोमीटर आहे.
पुणे महापालिकेत समाविष्ट होणारी गावे :
म्हळुंगे, सूस, बावधन(बुदुक), किरकटवाडी, पिसोळी, लोहगाव, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, शिवणे, आंबेगाव, हडपसर, मुंढवा, मांजरी (ब्रुद्रुक), नऱहे, उंडरी, धायरी, आंबेगाव (ब्रुद्रुक), उरळी देवाची, मंतरवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, नांदोशी, मांगेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबळकरवाडी, जांभुळवाडी, काळेवाडी आणि वाघोली.