पुणे : कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने ऐन जुलैमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात १ ते २३ जुलै या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, आता निर्माण होत असलेल्या प्रणालीमुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यात, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, जिल्ह्यातील जुलैमधील पावसाची तूट भरून निघण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.
मोसमी पावसाच्या काळात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा मानला जातो. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली नाही. शहर, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर घाटमाथ्यावरील काही ठिकाणी जोराचा पाऊस पडला.हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, १ ते २३ जुलै या काळात जिल्ह्यात सरासरी २२१.९ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा याच काळात जिल्ह्यात ११८.९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे पश्चिमेकडे सरकली नाहीत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे घाटमाथा, किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.’
‘बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या प्रणालीचा प्रभाव, अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांच्या तीव्रतेत होत असलेली वाढ यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे शहर आणि जिल्ह्यातील पावसाची तूट भरून निघेल,’ असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.