पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी २०२३) निकाल १२ जूनला सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबवण्यात येणार असून, प्रथमच मोबाइल ॲपद्वारे उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती, सूचना आणि जागा वाटपाबाबतची माहिती मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी ही माहिती दिली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १९ प्रवेश परीक्षांपैकी १७ परीक्षा घेण्यात आल्या असून त्यापैकी १६ परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षांना एकूण ९ लाख १३ हजार १६ विद्यार्थी उपस्थित होते. उर्वरित दोन परीक्षा  जून आणि जुलैमध्ये घेण्यात येतील. बी. एस्सी नर्सिंग-सीईटी २०२३ ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच सीईटी कक्षामार्फत दिनांक १९ जूनला  घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ हजार ३८० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्यातील एकूण ७५ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.

हेही वाचा >>>‘त्या’ मुलांची कुटुंबीयांशी पुन्हा झाली भेट!, रेल्वे सुरक्षा दलाकडून १६३ जणांची सुटका

 केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे बारावी गुण, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक सात-बारा उतारा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र, दाखल्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मान्यतेबाबत संस्था, महाविद्यालये, तसेच विद्यार्थीच्या लॉगीन आयडीमध्ये कळविण्यात येईल, असे वारभूवन यांनी सांगितले.

अडचणी सोडवण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम

शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन, पालक, उमेदवारांच्या समस्या आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही वारभूवन यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mht cet result on june 12 admission process details announced pune print news ccp 14 ysh
First published on: 09-06-2023 at 12:15 IST