पुणे : शहरातील अनेक रस्त्यांवर बेकायदा पद्धतीने जाहिरात फलक उभारण्यात आले असून, अनधिकृत पथारी व्यावसायिकांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या जाहिरात फलकांसह या व्यावसायिकांवर कारवाई न करणाऱ्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत, असे उत्तर नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले.

कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी शहरातील दिवसेंदिवस गंभीर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. वाहनांची वाढलेली भरमसाठ संख्या, पोलीस, महापालिका आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून होणारे दुर्लक्ष, याबाबत सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती.

शहरात महापालिका रस्त्यांचे रुंदीकरण करत असली तरी त्यावर अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे होतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघातांची संख्या वाढल्याने घरातून बाहेर पडलेली व्यक्ती परत येईल की नाही? अशी भीती नागरिकांमध्ये असते. याबाबत राज्य सरकार काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, शहरातील रस्त्यावर झालेली अतिक्रमणे ही वस्तुस्थिती असून, ती तातडीने काढण्याचे आदेश महापालिकेस दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, जर या अतिक्रमणांवर कारवाईस दिरंगाई झाली अथवा कारवाई केली जात नसल्यास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून महापालिकेस देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकात्मिक वाहतूक विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याद्वारे, मेट्रो, उड्डाणपूल, रस्ता रूंदीकरण, भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत.