चाकणनजीक असलेल्या धामणे गावात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या कोमल कोळेकर (वय १७) हिच्या खूनप्रकरणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांकडून या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तूर्तास तरी अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर खेड तालुक्यात खळबळ उडाली होती.

चाकणपासून वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या धामणे गावातील शेतकरी कुटुंबातील कोमल शांताराम कोळेकर (वय १७) हिचा दोन महिन्यांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला. कोमल १ डिसेंबर या दिवशी आईबरोबर शेतात काम करत होती. त्या वेळी कोमल मैत्रिणीकडे जाऊन येते तसेच तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी घरी जाते, असे आईला सांगून तेथून निघाली. त्यानंतर बऱ्याच वेळ ती शेतात न आल्याने आई घरी गेली. तेव्हा कोमल घरात नसल्याचे उघडकीस आले. तिच्या कुटुंबीयांनी कोमलच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तिचा मोबाइल संच बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिचे वडील आणि भावाने कोमलचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र कोमलचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कोळेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सुरुवातीला कोमलचे एका गाडीतून अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान, कोमलचा भाऊ प्रशांत तीन डिसेंबर रोजी सकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेला, तेव्हा पाण्याच्या वाहिनीजवळ मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. त्याने अंगावर असलेल्या जाकीट तसेच कपडय़ावरून ओळख पटवली. घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला दगड, मोबाइल संच सापडला. कोमलची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्याने तिच्या डोक्यात दगड घातला तसेच तिचा चेहरा विद्रूप करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपविभागीय अधिकारी राम पठारे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करून मारेकऱ्याला पकडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. धामणे गावात अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची बातमी खेड तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्या वेळी कोपर्डी खटल्याचा निकाल लागला होता, त्यामुळे खेड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा खून चर्चेचा विषय झाला होता. ग्रामस्थ भयभीत झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून या गुन्हय़ाचा तपास करण्यासाठी पथके तयार करण्यात आली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.

पोलिसांकडून विविध शक्यता गृहीत धरून तपास सुरू करण्यात आला. शांताराम कोळेकर नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावले होते. कोमलचे बालपण मुंबईत गेले होते. कोमलच्या दोन बहिणींचा विवाह झाला होता. त्यानंतर शांताराम पुन्हा गावात आले. पत्नी, मुलगा प्रशांत त्यांना शेतीत मदत करत होता. कोमल दहावी उत्तीर्ण झाली, मात्र तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही. कोमलने शेतीकामात मदत करण्याचा निर्णय घेतला होता. कोमलच्या खुनामागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून गावातील काही जणांची चौकशी करण्यात आली. तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. कोमलचा भाऊ प्रशांत याची चौकशी करण्यात आली तेव्हा धामणे गावापासून काही अंतरावर असलेल्या एका वेफर्स कंपनीतील कामगारांवर त्याने संशय व्यक्त केला. पोलिसांकडून चौकशीकामी कंपनीतील परप्रांतीय तरुणांना ताब्यात घेण्यात आले, मात्र चौकशीत काही निष्पन्न झाले नाही. पोलिसांकडून परिस्थितिजन्य पुरावे गोळा करण्यात आले. मात्र, अद्याप तपास पुढे सरक लेला नाही. मारेकरी पोलिसांच्या दृष्टिक्षेपात असला तरी त्याच्याविरुद्ध पुरावे जमा करण्यास काही अडथळे आहेत. कोमलच्या खुनानंतर पोलिसांनी न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार पोलिसांनी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

न्यायवैद्यकीय अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. पोलिसांची सारी भिस्त न्यायवैद्यकीय अहवालावर आहे. अहवाल मिळाल्यानंतर तपासाला गती मिळू शकेल, अशी माहिती ग्रामीण पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिली. गेले दोन महिने पोलिसांकडून अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणाचा तपास सुरूआहे. प्रेमप्रकरण, ऑनर किलिंग अशा शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तांत्रिक तपासात फारशी माहिती निष्पन्न झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांची चौकशी, कामगारांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. परिस्थितिजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवालावर पोलिसांची भिस्त आहे. कोमलचा मारेकरी पोलिसांच्या दृष्टिक्षेपात असला तरी पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

rahul.khaladkar@expressindia.com