पुणे : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) मुख्यालयातच गैरप्रकार उघडकीस आला आहे. जीवशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांच्या बैठकीवेळी लातूर येथील प्रमुख नियामकाने मोबाइलवर नमुना उत्तरपत्रिकेच्या हस्तलिखिताची छायाचित्रे काढून धाराशिव जिल्ह्यातील दोन शिक्षकांना पाठवल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी संबंधितावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य मंडळातील शारदा सभागृहात गुरुवारी जीवशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक होती. त्यासाठी सर्व नऊ विभागीय मंडळांतील मुख्य नियामकांसह मराठी आणि उर्दू माध्यमाचे नियामक उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता बैठकीवेळी सर्वांचे मोबाइल जमा करून घेण्यात आले. बैठकीला एकूण १५ सदस्य असताना १४ मोबाइल जमा झाले. त्यात लातूर विभागीय मंडळातील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमुख नियामकाने मोबाइल नसल्याचे सांगितले. त्याबाबत त्यांनी लिहूनही दिले. मात्र, ११.३० वाजता बैठक सुरू झाल्यावर नमुना उत्तरपत्रिकेचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मराठी माध्यमाच्या एका सदस्याने संबंधित प्रमुख नियामक मोबाइलद्वारे हस्तलिखिताची छायाचित्रे काढत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. याबाबत विचारणा केल्यावर संबंधित प्रमुख नियामकाने स्वत:कडे असलेला मोबाइल काढून दिला. या मोबाइलची पडताळणी केल्यावर त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील मंकणी येथील दोन शिक्षकांना ती छायाचित्रे पाठवल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित मोबाइल जप्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित प्रमुख नियामकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.