पिंपरी: भाजपकडून बारामती तथा मुंबईसाठी कोणतेही ‘मिशन’ नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार राज्यात प्रस्थापित होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जेवढे उमेदवार दिले जातील, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा : शिंदे गटाने लढवलेल्या कोणत्याही जागेवर दावा नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बावनकुळे शहरात आले होते. तेव्हा पत्रकारांनी बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, २०२४ मध्ये जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा कोणाच्या पायाखालची वाळू घसरते हे स्पष्टपणे दिसून येईल. यापुढे भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मोलाचे ठरणार आहे. महाराष्ट्र आता यापूर्वीची चूक पुन्हा करणार नाही. जनता भाजपच्या पाठीशी अगोदरही होती आणि आताही आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपला बहुमत मिळाले होते. मात्र, उध्दव ठाकरे यांच्याकडून दगाफटका झाल्याचे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आता खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. उध्दव ठाकरे यांचा केवळ गट आहे. मुख्यमंत्र्यांना दिवसेंदिवस जनतेचे पाठबळ मिळत आहे, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. काँग्रेस पक्षाला शेवटची घरघर लागली असून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा हा फुसका बार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात शहराध्यक्ष गैरहजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी पोहोचले. माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, शहराध्यक्ष महेश लांडगे व त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. आमदार लांडगे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बाहेर गेले होते. याबाबतची कल्पना त्यांनी प्रदेशाध्यक्षांना दिली होती, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.