पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला खरा; पण त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत मिश्र कचऱ्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक नागरिक ओला व सुका असा मिश्र कचरा कुठेही टाकत असल्याने त्याचा फटका कचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रिया केंद्रांना बसत आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा टाकावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शहरात रात्रीच्या वेळी विविध भागांतून २५० टन कचरा गोळा केला जात आहे. मात्र, यामध्ये ओला आणि सुका अशा मिश्र कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी शहरातील कचरा पहाटेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत उचलला जात होता. अनेक ठिकाणी रात्री नागरिकांकडून, विक्रेत्यांकडून कचरा टाकला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी रात्री कचरा उचलण्याचे आदेश घनकचरा विभागाला दिले आहेत. तसेच, महापालिका आयुक्त स्वत: रात्रीच्या वेळी भेटी देत पाहणी करीत आहेत.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर घनकचरा विभागाने रात्रपाळीत कचरा गोळा करून रस्त्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. एकूण सफाई कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ३५ टक्के कर्मचारी रात्रपाळीत काम करत आहेत. मात्र, रात्री गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यामध्ये मिश्र कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. दररोज रात्री शहरातून सर्वसाधारण २५० टन कचरा गोळा केला जातो. परंतु, या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. त्यामुळे एकूण गाेळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यामध्ये ३० ते ३५ टक्के कचरा मिश्र स्वरुपाचा असल्याची माहिती समोर आली आहे.

कचरा वर्गीकरण करून येत नसल्याने त्यावर प्रक्रिया करणाऱ्या ठेकेदारांकडून तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह काही ठेकेदार, अधिकारी उपस्थित हाेते. या बैठकीत मिश्र कचऱ्याविषयी मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, रात्रपाळीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या दाेन घटना घडल्याची माहितीदेखील समोर आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे, तसेच रात्रपाळीत महिला कर्मचाऱ्यांचा समावेश नसावा, कचरा डेपाेमध्ये गाड्या रिकाम्या करण्याचा कालावधी कमी करण्यात यावा, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील शट-डाउनचे प्रमाण कमी करावे, अशा सूचना या बैठकीत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

महापालिकेने रात्री कचरा उचलण्यास सुुरुवात केल्यानंतर रात्री गोळा होणाऱ्या कचऱ्यामध्ये मिश्र कचरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आले आहे. कचरा गाेळा करण्याची वेगळी काही व्यवस्था करता येईल का, याचा विचार सुरू आहे. – पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या येतात, त्या वेळी अनेक नोकरदार घरात नसतात. महापालिकेने कचरा संकलन केंद्रे २४ तास सुरू करावीत, जेणेकरून नागरिक आपापल्या वेळेनुसार, त्या ठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा नेऊन टाकतील. – एक नागरिक.