पुणे : टाटा पॉवरच्या मुळशी धरण परिसरात जपानमधील मियावाकी पद्धतीने वन निर्माण केले जाणार आहे. धरणाच्या परिसरात ४७ एकरांवर २ लाख ७० हजार देशी वनस्पती लावल्या जाणार आहेत. यातून हवेतील कार्बन शोषला जाण्याचे प्रमाण वाढण्यासोबत भूजल पातळी वाढून जमिनीची धूपही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा पॉवरने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.

स्थानिक जैवविविधता पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, हरित आच्छादन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत टाटा पॉवरकडून मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वृक्षारोपणासाठी योग्य जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, देशी झाडांबाबतच्या संशोधनात्मक माहिती कंपनी पुरविणार आहे. याचवेळी बीएनएचएसकडून या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, देखरेख आणि मियावाकी वनाचे पर्यावरणीय व्यवस्थापन या बाजू सांभाळण्यात येतील. हा प्रकल्प पाच वर्षांत तीन टप्प्यांत आडगाव, बारपे या गावांभोवतालच्या ४७ एकरांवर राबविला जाणार आहे. मियावाकी वनामुळे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जैवविविधतेचे संवर्धन होणार आहे.

याबाबत बीएनएचएसचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी म्हणाले की, टाटा पॉवरने जबाबदारीचे भान राखून तयार केलेल्या व्यवसाय पद्धती आणि समुदाय केंद्रित उपक्रमांद्वारे शाश्वत विकासाला चालना दिली आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसंस्थेचे संवर्धन आणि स्थानिक जैवविविधता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे टाटा पॉवरशी पर्यावरण संवर्धनासाठी ही भागीदारी अर्थपूर्ण ठरणार आहे.

टाटा पॉवरच्या सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख हिमल तिवारी म्हणाले की, एक शतकाहून अधिक काळ पश्चिम घाटात टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प निसर्ग आणि विकास यामधील समन्वय दर्शवत आहेत. बीएनएचएसच्या सहयोगाने मियावाकी वनीकरणाचा हा उपक्रम त्याचाच भाग आहे, हा उपक्रम स्थानिक जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करेल. विज्ञानावर आधारित हे सहकार्य व्यवसायापुरते मर्यादित न राहता भारताच्या नैसर्गिक वारशाचे दीर्घकालीन संरक्षण म्हणून समोर येईल.

मियावाकी पद्धती म्हणजे काय?

मियावाकी ही जपानमधील वृक्षारोपणातून जलद वननिर्मिती करण्याची पद्धती आहे. यामध्ये मर्यादित जागेत जलद वाढणाऱ्या देशी वनस्पती लावून दाट आणि स्वयंपूर्ण स्थानिक वने निर्माण केली जातात. यामध्ये झाडांची काळजीपूर्वक निवड केली जाते. या पद्धतीमध्ये नैसर्गिक अधिवास पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. मातीची गुणवत्ता सुधारणा, भूजलपातळी वाढविणे आणि वन्यजीवांना आधार देणे, असे उद्देश यातून साध्य होतात.