लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांच्यासोबत पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके गेले आहेत. तर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा मोबाईल फोन बंद असल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही. दुसरीकडे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मी ‘राष्ट्रवादीत’च असल्याचे सांगत अजित की शरद पवार यांच्यासोबत सांगण्यास नकार दिला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरावर एकछत्री अंमल होता. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना पवार हेच शहरातील सर्व निर्णय घेत होते. शहरातील संघटनेतील निर्णयही पवारच घेत होते. शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार समर्थक आहेत. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे सुरुवातीपासून पवार यांच्यासोबत आहेत. आताही बनसोडे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. बनसोडे हे शपथविधीला उपस्थित होते. मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके हे देखील शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे शेळकेही अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट होते. बाजू जाणून घेण्यासाठी दोघांशी संपर्क साधला असता होवू शकला नाही.
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मी ‘राष्ट्रवादीत’च असल्याचे सांगितले. पण, अजित की शरद पवार यांच्यासोबत आहात असे विचारले असता त्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची भूमिका जाणून घेण्याबाबत वारंवार संपर्क साधला असता. तो होवू शकला नाही. तसेच चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनीही प्रतिसाद दिला नाही.