पुणे : पारधी आणि रामोशी समाजाविषयी आक्षेपार्ह विधान आणि राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे वादात सापडले. संतप्त आदिवासी समाजाने आमदार सोनवणे यांच्या जुन्नरमधील चाळकवाडी येथील ‘राजगड’ या निवासस्थानासमोर आंदोलन केले. त्यानतंर आमदार शरद सोनवणे यांच्यावर दोनवेळा माफी मागण्याची वेळ आली.

जुन्नर येथे अधिकाऱ्यांबरोबर आमदार सोनवणे यांनी गेल्या शुक्रवारी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी जुन्नर तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने पोलिसांनी सतर्क राहावे, अशा सूचना आमदार सोनवणे यांनी केल्या. या तालुक्यात होणाऱ्या चोऱ्या अहिल्यानगर भागातील रामोशी, फासेपारधी लोक करत असल्याचा आरोप आमदार सोनवणे यांनी केला. त्याचे तीव्र पडसाद या समाजांमध्ये उमटले.

पारधी समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी आमदार सोनवणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘ब्रिटिशांनी या समाजांवर गुन्हेगारीचा शिक्का मारला होता. मात्र, अद्यापही ब्रिटिशांची मनोवृत्ती असलेली माणसे आहेत. आमदार सोनवणे यांच्या वक्तव्यातून ही बाब दिसून येते. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा’. आमदार सोनवणे यांच्या विरोधात आदिवासी समाजाने आळेफाटा येथे आंदोलन केल्यानंतर त्यांनी या समाजाची माफी मागितली. या आंदोलनात बाळासाहेब शिरतर, धोंडीभाऊ भंडलकर, बबलू भंडलकर, साईनाथ शिरतर, सोनभाऊ भंडलकर, राहुल शिरतर, जितेंद्र भंडलकर, बाळासाहेब मस्कुले, नवनाथ शिरतर, गणेश गोफणे, रोहिदास बोरुडे, संदीप शितोळे, बाळासाहेब शितोळे, सोमेश्वर भंडलकर आदी सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिवासी समाजाची जाहीर माफी मागितले असतानाही जुन्नर येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके आणि घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाने सोनवणे यांच्या चाळकवाडी येथील राजगड या निवासस्थानासमोर आंदोलन केले. त्यानंतर आमदार सोनवणे यांनी आदिवासी मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात अशोक गभाले, अरुण काठे, नीलेश साबळे, प्रवीण पारधी, योगेश चपटे, शिवाजी चौरे, अरुण केदार, सोमनाथ मुकणे, नामदेव साबळे आदी सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.