निवडणुकीच्या रणधुमाळीतून पुणेकर असलेल्या अमृता खानविलकर व श्रुती मराठे या अभिनेत्रीही बाजूला राहू शकल्या नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारात रविवारी या दोन्ही अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. मराठी तारका ‘रोड शो’ माध्यमातून समोर आल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनीही चांगलीच गर्दी केली होती.
निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाल्याने जास्तीत जास्त भाग िपजून काढण्यासाठी सध्या सर्वाचेच प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या वतीने संध्याकाळी पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील गाडीतळ, भीमनगर, त्रिशुंडय़ा गणपती चौक, खडीचे मैदान, दारुवाला पूल, नरपतगीर चौक, ससून वसाहत, सोमवार पेठ, पोलीस वसाहत आदी भागांमधून पदयात्रा व ‘रोड शो’ काढण्यात आला. या दरम्यान अमृता व श्रुती या दोघींनीही पायगुडे यांचा प्रचार केला. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव ही सुद्ध मनसेच्या प्रचारात शनिवारी सहभागी झाली होती.
पायगुडे यांच्या पत्नी सविता, शहराध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक अजय तायडे, खलिफ दिल्लीबाले, ज्योती जया, प्रशांत मते, दिलीप बहिरट, अनूप जाधव, नरेश जगताप आदींनी पदयात्रेत सहभाग घेतला.