महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी गटनेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी मुंबईतील टिळक भवन येथे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धंगेकर प्रभाग १६ मधून निवडणूक लढणार असून त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. त्याचबरोबर धंगेकरांच्या प्रवेशामुळे पालकमंत्री गिरीश बापटांना यंदाच्या निवडणुकीमध्ये कडवे आव्हान असणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रोहित टिळक आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आणि कसब्यामध्ये अऩेक विकासकामे केली. पालकमंत्री गिऱीष बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे. मागील दोन विधानसभा निवडणूकांमध्ये धंगेकर यांनी बापटांसमोर क़डवे आव्हान उभे केले होते. धंगेकर यांनी २००९ साली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती. यानंतर झालेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची राज्यात लाट असताना देखील धंगेकर यांनी आव्हान दिले होते. मनसे मध्ये अनेक पदावर त्यांनी कामे पाहिले. त्याचबरोबर पक्षाची शहरातील सद्य स्थिती लक्षात घेता. धंगेकर यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या संपर्कात येऊन भाजपमध्ये प्रवेश निश्चित केला होता. मात्र कसबा मतदार संघातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. महिन्याभराच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी आज काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला. यामुळे कसबा मतदार संघाला एक ताकद मिळाली असल्याची चर्चा काँग्रेस पक्षातून ऐकण्यास मिळत आहे.