पुणे : शहरातील समस्या, नागिरकांचे प्रश्न, विकासकामातील अडथळ्यांबरोबर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर समाजमाध्यमातून सातत्याने आवाज उठविणारे मनसे नेते वसंत मोरे यांनी समाजमाध्यमातून एका प्रकाराला वाचा फोडण्याचा इशारा देत ही समस्या रातोरात सोडविल्याचे पुढे आले आहे. समस्या सुटल्यानंतर, ही आहे माझी सोशल मीडियाची ताकद, असे मोरे यांनी म्हटले आहे. कात्रज स्मशानभूमीत घडलेल्या या घटनेची माहिती मोरे यांनीच समाजमाध्यमातून दिली आहे.

स्मशानभूमीतील गॅस विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रेत ठेवण्यात आले होते. मात्र अचानक फ्यूज उडून विद्युत दाहिनी बंद पडली. त्यामुळे मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेतच राहिला. त्यामुळे नातेवाईकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. दोन तास होऊनही विद्युत दाहिनी काही नीट होईना. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. त्यामुळे विद्युत दाहिनी नीट करणारादेखील येईना. स्मशानभूमीतील कामगाराचा फोन आला. त्याने सांगितले की, तात्या, विद्युत दाहिनीत एका बॉडी दहन करण्यासाठी टाकली होती. मात्र मध्येच त्या विद्युत दाहिनीचे फ्यूज गेले आणि ती बंद पडली. आता ते नीट करणारा कामगारदेखील यायला नाही म्हणत आहे आणि संबंधित नातेवाईकांना सकाळी सावडण्यासाठी यायचे आहे.

हेही वाचा – नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आता २०२५ पासून, एमपीएससीचा निर्णय

हेही वाचा – “मी अजित दादांचा कट्टर”; पहाटेच्या शपथविधीचे साक्षीदार असलेले अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया; म्हणाले..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेचे गांभीर्य ओळखत मोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली. दोन तासांच्या आत अर्धवट जळालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाहीत, तर मी सोशल मीडियावर लाईव्ह करून मनसे स्टाईल दाखवेन आणि मग पुढे जे काही होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार, अशी तंबी वसंत मोरे यांनी दिल्यानंतर अधिकारी आणि ठेकेदार खडबडून जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या एक तासात विद्युत दाहिनी नीट केली. त्यानंतर विद्युत दाहिनीत अर्धवट जळालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. असे असताना एकही लोकप्रतिनिधी मदतीसाठी पुढे आला नाही. पण ही आहे माझी सोशल मीडियाची पॉवर, असे वसंत मोरे यांनी म्हटले.