मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंना, ‘नवहिंदू ओवैसी’ आणि मनसेला ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या टीकेला राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आणि ५ जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली.

“मला दोन घोषणा करायच्या होत्या. ते बोलले की आम्ही बोलायचं तेव्हा आम्ही बोलायचं हे काही योग्य नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी बोलेन. लोकांना भोंग्याचा धार्मिक विषय आहे असं वाटत आहे, पण हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहण्याची गरज आहे,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

“फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्ष हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असू तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमजान सुरु असल्याने काही सांगायचं नाही आहे. पण ३ तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे,” असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

“मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील,” असं राज ठाकरे म्हणाले.

राऊत राज ठाकरेंना म्हणाले ‘नवहिंदू ओवैसी’; MNS ची MIM शी तुलना करत म्हणाले, “…मग खरे ओवैसी भोंगा प्रकरणात पडतील”

मनसे कार्यकर्त्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर काढले जात नसतील तर आमच्या मुलांनी केलेल्या अनधिकृत कसं मानता? अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली. सुप्रीम कोर्टाने शांतताभंग करणाऱ्या लाऊडस्पीकरला परमिट देऊ नका असं सांगितलं आहे. आपण स्वत: काही गोष्टी समजून घेणार आहोत की नाही? मुस्लीम समाजालाही या गोष्टी समजल्या पाहिजेत. देशापेक्षा यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही. लोकांना या गोष्टीचा त्रास होत आहे याची कल्पना त्यांना येणं आवश्यक आहे असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आमचे हात काय बांधले आहेत का? अशी विचारणा यावेळी राज ठाकरेंनी इशारा देणाऱ्यांना दिला. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता राज ठाकरे यांनी आपण अशा लवंडयांबद्दल फार काही बोलत नाही असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका,” असा इशारा राज ठाकरेंनी दिल्लीतील हिंसाचारावर बोलताना दिला.