महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये घेतलेल्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेसा उघडपणे विरोध करणारे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. आज मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुण्यातील नगरसेवक साईनाथ बाबर यांना मनसेनं शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. आज साईनाथ बाबर यांच्यासोबत काही निवडक अधिकारी राज यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी भेटीसाठी आले असता बाबर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचं पत्रक त्यांना देण्यात आलं. या नियुक्तीवर वसंत मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचं भाषण कार्यकर्त्यांना कळलं नव्हतं असं म्हटलेलं. तसेच आपण आपल्या वॉर्डमध्ये शांततेला प्राधान्य देणार असून मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा लावणार नाही असं मोरेंनी स्पष्टपणे सांगितलेलं. त्यानंतरच मोरे हे राज यांच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा सुरु झालेली. तर दुसरीकडे मोरेंसारख्या कार्यकर्त्याने ही भूमिका घेतल्याने राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा मनसेच्या अंतर्गट गोटात होती. असं असतानाच आज मनसेने पुण्यातील अध्यक्षपद मोरे यांचे चांगले मित्र असणारे बाबर यांना दिलं आहे.

बाबर यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना मोरे यांनी, “मी राज ठाकरे यांच्याकडून अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन,” असं म्हटलं आहे. मुंबईतील बैठकीला आपण उपस्थित नव्हतो असंही मोरेंनी सांगितलंय.

मनसेनं अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातलं पत्र सोपवत असल्याचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्याआधीच पुण्यामधील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुस्लीमविरोधी भूमिकेवरुन नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळेच शहराध्यक्षांसंदर्भात असं काही होऊन नाचक्की होऊ नये म्हणून मनसेने तातडीने शहराध्यक्ष बदलल्याची चर्चाही पुण्यात आहे.