पुणे : लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवड परिसरात राहायला आहेत. त्या गुरुवारी (२१ ऑगस्ट) लक्ष्मी रस्त्यावरील एका वस्त्रदालनात खरेदीसाठी आल्या होत्या. बेलबाग चौकात गर्दी होती. महिलेने तिचे मंगळसूत्र पिशवीत ठेवले होते. चोरट्यांनी गर्दीत पिशवीची चेन उघडून दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. खरेदी केल्यानंतर महिलेने पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीतून मंगळसूत्र चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलीस कर्मचारी पडघमकर तपास करत आहेत.
तुळशीबाग, रविवार पेठेतील कापडगंज परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने आणि रोकड लांबविण्यात आल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने चोरीला जाण्याची ही चौथी घटना आहे.
पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पादचारी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना वाघाोेलीतील केसनंद रस्ता परिसरात घडली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाघोली परिसरात राहायला आहेत. त्या गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास केसनंद रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री थोरात तपास करत आहेत.
साधू वासवानी चौकात मोबाइल हिसकावला
पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी चौकात पादचाऱ्याचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना बुधवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी घडली. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे साधू वासवानी चौकातून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील ५० हजार रुपयांचा मेाबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.