पुणे : महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोबाईल बिल भरले नसल्याचे कारण देऊन सोमवारी दुपारी अचानक ही सेवा बंद करण्यात आली. सुमारे दोन तास ही सेवा बंद होती. दोन तासानंतर पुन्हा ही सेवा सुरु झाली.
महापालिकेने अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एका खासगी मोबाईल कंपनीकडून सिम कार्ड घेतली आहेत. ही सेवा पोस्ट-पेड असल्याने त्याचे बिल महापालिकेकडून दर महिन्याला भरले जाते. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत झाल्यानंतर हे कार्ड स्वत:च्या नावावर करून घेऊन त्याचे बिल भरतात. महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जवळपास तीन ते साडेतीन हजार कार्ड आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर बिल न भरल्याने सेवा आणि इंटरनेट सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. याबाबत काही अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला कळविले होते. मात्र, बिले भरली आहेत, काही होणार नाही असे सांगण्यात आले. सोमवारी दुपारी एकनंतर अनेक अधिकाऱ्यांची मोबाइलची आउटगोइंग सेवा आणि इंटरनेट बंद झाले. त्यानंतर सुमारे दोन तासांनी ही सेवा पूर्ववत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडे मोबाईल कंपनीची कोणतीही बिले थकलेली नव्हती. ही संबधित कंपनीची चूक आहे. त्यांना पालिकेकडून नोटीसही बजाविण्यात येणार आहे. तसेच, वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे.- राहुल जगताप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पुणे महापालिका