लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मोबाइल चोरणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्याकडून मोबाइल चोरीचे आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

आकाश कोंडिबा कावले (वय २१, रा. उमापूर, बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. कावले याने गर्दीच्या भागातून मोबाइल संच चोरले होते. गुन्हे शाखेचे युनिट पाचचे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्या वेळी कावले याच्या संशयास्पद हालचाली साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने टिपल्या. त्याच्याकडे पिशवी होती. पोलिसांच्या पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा पिशवीत मोबाइल संच सापडले. कावले चोरलेले मोबाइल विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आणखी वाचा- सातारा रस्त्यावर दुकानात सिलिंडरचा स्फोट; दोनजण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीत त्याने हडपसर, मुंढवा, वानवडी, मार्केट यार्ड भागातून मोबाइल चोरल्याचे उघडकीस आले. कावले याने मोबाइल चोरीचे आठ गुन्हे केल्याची माहिती तपासात मिळाली. त्याच्याकडून आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, रमेश साबळे, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांनी ही कारवाई केली.