पुणे : ‘पावसाळ्यात होणारी कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापासून तयारी सुरू करणे गरजेचे आहे. आठवडाभरात महापालिका, अग्निशामक दल, तसेच विविध यंत्रणांशी समन्वय साधून माॅक ड्रिल करावे. पावसाळ्यात कोंडी झाल्यास आदेशाची वाट न पाहता वाहतूक शाखेतील सर्व पोलिसांनी रस्त्यावर उतरावे,’ असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिले.

वाहतूक शाखेतील पोलिसांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. या वेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, तसेच निवृत्त पोलीस अधिकारी सुरेंद्रनाथ देशमुख, अभ्यासक्रम मार्गदर्शक मंजिरी गोखले या वेळी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पावसाळ्यात कोंडी होती. रस्त्यात झाडाच्या फांद्या पडतात. त्या हटवून वाहतूक सुरळीत करण्याची गरज असते. त्यासाठी अग्निशामक दल, तसेच महापालिकेच्या उद्यान विभागासह विविध यंत्रणांशी समन्वय साधणे गरजेचे आहे. गेल्या पावसाळ्यात काही भागांत कोंडी झाली होती. कोंडी होण्यामागची कारणे शोधणे गरजेचे आहे. ज्या भागात पाणी साचते, तेथील पाण्याचा उपसा करण्यासाठी त्वरित मोटारपंपाचा वापर करणे गरजेचे असते. पावसाळी कोंडी सोडविण्यासाठी आतापासून वाहतूक पोलिसांनी तयारी करणे गरजेचे आहे. महापालिकेसह विविध यंत्रणांशी समन्वय साधून आठवडाभरात माॅक ड्रिल करावे.’

‘शहराच्या वेगवेगळ्या भागांतील वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट न पाहता त्वरित उपाययोजना कराव्यात. पुढील तीन महिने वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत,’ असे त्यांनी नमूद केले.

‘वाहतूक पोलिसांचे वर्तन महत्त्वाचे’

‘वाहतूक पोलिसांनी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या वाहतूक पोलिसांनी सक्षम असणे गरजेचे आहे. रस्त्यावरची कोंडी सोडविताना पोलिसांचे वर्तन महत्त्वाचे असतो. एखादी व्यक्ती वाद घालत असेल, तर त्याला समजावून सांगा. हातातील काम सोडून त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. कायदेशीर कारवाई करा. मात्र, एखाद्याने अरेरावी केल्यास त्याला कायद्याच्या चौकटीत धडाही शिकवा. वाहतूककोंडी सोडविणे, सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे आयुक्त म्हणाले.

मुंबईच्या धर्तीवर पुण्यात प्रशिक्षण संस्था

‘मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही वाहतूक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. या संस्थेसाठी जागा निश्चिती, निधी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत येण्यापूर्वी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत येण्यापूर्वी वाहतूकविषयक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यापूर्वी पुणे पोलिसांना वाहतूक पोलिसांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली आहे,’ असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.