पुणे : कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने वातानुकुलित (एसी) स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या प्रवेशद्वारांजवळ, तसेच पुणे स्टेशन परिसरात ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून, याचा उपयोग प्रामुख्याने महिलांना होणार आहे. या स्वच्छतागृहांसाठी महापालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये वायफाय, मोबाइल आणि लॅपटाॅप चार्जिंग सुविधा असणार आहे. नागरिकांना ठरवीक शुल्क भरून स्वच्छतागृहाचा वापर करता येणार आहे.
शहरात दररोज हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. शहरात महापालिकेच्या वतीने अनेक भागांत नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्याची स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने त्याचा फारसा वापर केला जात नाही.
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या एका बैठकीत पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना अद्ययावत स्वच्छतागृहांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच पुणे स्टेशन परिसरात ही ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहे उभारावीत, असेही त्यांनी सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरात सात ठिकाणी अद्ययावत आणि वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये वायफाय, मोबाइल आणि लॅपटाॅप चार्जिंगचीही सुविधा असणार आहे. एका ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहासाठी सर्वसाधारण ५० लाख रुपये खर्च येणार आहे.
स्वच्छतागृह उभारणे आणि त्यांची देखभाल करणे यासाठीचे विविध पर्याय महापालिकेकडे उपलब्ध असून, त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्तावदेखील मागविण्यात आले आहेत. ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर ही स्वच्छतागृहे असल्याने त्याची स्वच्छता चांगल्या प्रकारे राहील. नागरिकांना येथे वेगवेगळ्या सोयीसुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
या स्वच्छतागृहांमध्ये अंघोळीसाठी आवश्यक व्यवस्था, कपडे बदलण्यासाठी खोली आणि प्रसाधनगृह असेल. याबरोबरच मोबाइल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा तसेच वायफाय सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपंग व्यक्तींनाही याचा वापर करता यावा, यासाठी येथे रॅम्प असणार आहेत. स्वच्छता ठेवण्यासाठी पुरेसे स्वच्छता कर्मचारी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी येथे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.खासगी संस्थांनी या स्वच्छतागृहांची उभारणी केल्यास त्यांचा उभारणीचा खर्च, तसेच देखभाल-दुरुस्तीचा खर्च भरून काढता यावा, यासाठी उत्पन्नाचे पर्याय म्हणून संबंधिताला जाहिरातींचे हक्कही देण्याचा विचार महापालिकेने सुरू केला असल्याचे कदम यांनी सांगितले.
स्वच्छतागृहांची ठिकाणे
– चांदणी चौक- बाणेर
– कात्रज चौक- शेवाळेवाडी
– वाघोली- पुणे विमानतळ
– पुणे रेल्वे स्टेशन जवळ
पुणे शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सात ठिकाणी अद्ययावत आणि वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. यासाठी चार कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. ही स्वच्छतागृहे सशुल्क असणार आहेत. – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे महापालिका