राज्यातील ३५ पैकी २४ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या दीड महिन्यात अतिशय अपुरा पाऊस पडला असून, अजूनही पाऊस चांगल्या प्रकारे सक्रिय होण्यासाठी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. सध्या तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे, मात्र त्यात विशेष जोर नाही.
पावसाने राज्यात जवळजवळ गेल्या चार आठवडे उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीची स्थिती गंभीर आहे. मान्सून २० जुलैपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता होती. मात्र, हवामान अनुकूल नसल्याने आता त्यासाठी २५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील ३५ जिल्ह्य़ांपैकी मुंबई, मुंबई उपनगर, सातारा, औरंगाबाद आणि पूर्व विदर्भातील सात जिल्हे वगळता इतर जिल्ह्य़ांमध्ये अतिशय अपुरा पाऊस पडला आहे.
पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ तारखेच्या आसपास बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रताही वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या अंतर्गत भागासह संपूर्ण दक्षिण भारतात चांगला पाऊस पडेल. त्याच वेळी अरबी समुद्रात किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. त्यामुळे कोकणातही चांगला पाऊस होईल.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी शनिवारी पाऊस पडला. त्यात पुणे (२ मिलिमीटर), कोल्हापूर (१), महाबळेश्वर (१७), सातारा (०.४), सांताक्रुझ (०.२), रत्नागिरी (१), भीरा (११), उस्मानाबाद (१), अकोला (१), ब्रह्मपुरी (१७), नागपूर (६), वर्धा (१) या ठिकाणांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2015 रोजी प्रकाशित
राज्यात मोठय़ा पावसासाठी आणखी आठवडाभर प्रतीक्षा
पाऊस चांगल्या प्रकारे सक्रिय होण्यासाठी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. सध्या तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे, मात्र त्यात विशेष जोर नाही.

First published on: 19-07-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon delay week climate