‘‘मोठमोठय़ा इमारती आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर म्हणजे विकास ही संकल्पना चुकीची आहे. त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होत असून जागतिक तापमानवाढीचे संकट उभे राहिले आहे. विकासाची परिभाषा आपल्याला समजलीच नाही. देशाचे अर्थकारण हे अर्थमंत्र्यांवर नाही तर मान्सूनवर अवलंबून आहे,’’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्यां सुनीता नारायण यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद फाउंडेशन, केंद्र सरकारचे युवक आणि क्रीडा मंत्रालय, राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, पुणे महापालिका यांच्यातर्फे आयोजित चौथ्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, महापौर चंचला कोद्रे, दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठाच्या सहसंचालिका डॉ. किकी क्रुसॉन, नेमबाज रंजन सोधी, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी, मुंबई दूरदर्शनचे संचालक मुकेश शर्मा, विद्यार्थी प्रतिनिधी डॉ. स्वाती अय्यर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड, मंगेश कराड, प्रा. डी. पी. आपटे या प्रसंगी उपस्थित होते. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार रिशांग किशिंग यांना विशेष जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या किशिंग यांनी दृक-श्राव्य माध्यमातून संवाद साधला.
नारायण म्हणाल्या, पर्यावरणाचा ऱ्हास करून होत असलेल्या प्रगतीमुळे जागतिक तापमानवाढ हे संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेत पडणारा बर्फ आणि इंग्लंडमध्ये आलेला पूर हे त्याचेच द्योतक आहे. आपल्या देशामध्ये मान्सून हेच विकासाचे परिमाण आहे. पाऊस केव्हा आणि किती येणार याची शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. डिझेलच्या धुलिकणांमुळे प्रदूषणाचा धोका वाढला असून त्याचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वाधिक प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीमध्ये एलपीजीचा इंधन म्हणून वापर वाढवावा यासाठी प्रयत्न होत आहेत. प्रदूषणमुक्त होण्यासाठी युवकांनी संशोधनाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
टोपे म्हणाले, युवकांना सार्वजनिक जीवनातील प्रश्नांची सोडवणूक करण्याचे प्रात्यक्षिक भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून मिळत आहे. शांती, प्रगती आणि समृद्धी यासाठी कार्यक्षम नेतृत्व विकसित करण्याचे काम झाले पाहिजे. विद्यापीठांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका व्हाव्यात यासाठीचे विधेयक मंजूर करून घेण्यात येणार आहे. तुषार गांधी, रंजन सोधी, विश्वनाथ कराड, राहुल कराड यांनी मनोगत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याने पादचारी मार्ग करावेत
प्रदूषणामध्ये पुण्याची हालत दिल्लीपेक्षा वेगळी नाही. पुण्यामध्ये दररोज ६०० ते ७०० नव्या वाहनांची नोंदणी होते. फ्लायओव्हरच्या संख्येत वाढ होते तेवढी गाडय़ांची संख्या आणि वाहनांच्या वेगातही वाढ होते. २० टक्के सायकल चालविणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग नाही. एवढेच नव्हे तर पायी जाणाऱ्यांसाठी पादचारी मार्गदेखील नाहीत. त्यामुळे पादचारी मार्ग करावेत, अशी सूचना सुनीता नारायण यांनी महापौर चंचला कोद्रे यांना केली.

राजकारणात जाण्याची इच्छा- मलाला
राजकारण हे देशाच्या प्रगतीचे साधन असून मलादेखील राजकारणात जाण्याची इच्छा असल्याचे पाकिस्तानमधील महिला आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यां मलाला युसुफझई यांनी सांगितले. भारतीय छात्र संसदेच्या दुसऱ्या सत्रात त्यांनी दृक-श्राव्य माध्यमातून संवाद साधला. राजकारणापासून दूर राहून आपण प्रश्न सोडवू शकणार नाही. एक विद्यार्थी, एक पुस्तक आणि एक शिक्षक हे क्रांतीचे द्योतक हा नव्या बदलाचा कणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon is the main factor for nations economy and not on finance minister
First published on: 11-01-2014 at 03:00 IST