पुणे : Maharashtra Weather Forecast राज्यात शुक्रवार,१५ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाचा विशेष जोर राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की उत्तर प्रदेशावर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात असणाऱ्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा >>> महिनाभरात इंडिया आघाडीत जागांचे वाटप; शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार,१८ सप्टेंबपर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.