पुणे : पाच दिवसांपासून प्रवास थंडावलेले नैऋत्य मोसमी वारे पुढील ४८ तासांत पुन्हा आगेकूच करण्याची शक्यता हवामान विभागाने बुधवारी व्यक्त केली. त्यामुळे आता मोसमी पावसाच्या केरळ आणि तळकोकणातून महाराष्ट्रातील प्रवेशाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पोषक वातावरण नसल्याने सलग पाचव्या दिवशीही (२५ मे) नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. गेल्या पाच दिवसांपासून त्यांची समुद्रातच रखडपट्टी सुरू आहे. मात्र, दोन दिवसांत परिस्थितीत बदल होणार असून, मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार होणार असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठय़ा प्रमाणावर बाष्प घेऊन आलेले मोसमी वारे १६ मे रोजी अंदमानात बरसले आणि तेथे मोसमी पावसाचा प्रवेश जाहीर झाला. नियोजित सर्वसाधारण वेळेपेक्षा मोसमी पाऊस अंदमानात सहा दिवस आधीच दाखल झाला. त्याअनुषंगाने केरळमधून भारतातील प्रवेश आणि महाराष्ट्रातील प्रवेश वेळेआधीच होईल, असे भाकीत हवामान विभागाकडून करण्यात आले. मोसमी पाऊस अंदमानात पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा केरळमधील प्रवेश २७ मे रोजी, तर महाराष्ट्रातील प्रवेश ५ जूनला होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात मोसमी वाऱ्यांची कोणतीही प्रगती झाली नाही. मोसमी पाऊस १६ मे रोजी अंदमानात पोहोचल्यानंतर चार दिवस त्याची बंगालच्या उपसागरात प्रगती झाली. २० मे रोजी त्याने दक्षिण अरबी समुद्रातही प्रवेश केला. मात्र, त्यानंतर सलग पाच दिवस तो त्याच जागेवर स्थिर आहे. हवामान विभागाने गुरुवारी मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीबाबत भाष्य केले. त्यानुसार पुढील ४८ तासांमध्ये मोसमी वाऱ्यांची प्रगती पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकरच भारतात प्रवेश करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात पावसाळी वातावरण

महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागांत पावसाळी वातावरण तयार होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक भागांत दुपापर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर ढगाळ स्थिती तयार होईल. काही भागांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र सध्या काही भागात पाऊस होत आहे. या विभागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon rains continue next 48 hours curiosity admission kerala maharashtra ysh
First published on: 26-05-2022 at 00:02 IST