पुणे : पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागात हलक्या तर मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर ढगाची दाटी झालेली आहे. बुधवार आणि गुरुवारी ढगांची दाटी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवेत आद्र्रता आहे आणि तापमानही सरासरी ३० अंश सेल्सिअसच्या घरात आहे, त्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात दमदार सरी विदर्भ वगळता मंगळवारी राज्यभरात हलक्या सरी पडल्या. दिवसभरात विदर्भात अकोल्यात ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर १७, नाशिक २०, सांगली २५, सातारा ४५ आणि सोलापुरात १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्रात पहिल्यांदाच चांगल्या सरी पडल्या आहेत. मराठवाडय़ात बीडमध्ये ११ आणि परभणीत २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर पावसाचा जोर नव्हता.