विषाणू संसर्गाबाबत भीती असलेल्या शहरवासीयांसाठी दिलासा

पुणे : एका बाजूला पुणे शहरातील करोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडलेला असतानाच तब्बल सहा हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे विषाणू संसर्गाबाबत भीती असलेल्या शहरवासीयांसाठी ही बाब दिलासा देणारी ठरत आहेत.

सोमवारी रात्री पुणे महापालिके च्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. सोमवारी पुणे, पिंपरी आणि परिसर मिळून म्हणजेच संपूर्ण पुणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्येने १२ हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडत १२,२४३ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. त्यांपैकी १०,०२१ एवढे रुग्ण पुणे शहरातील असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर टाळेबंदीतील नियम काही शिथिल करून शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर शहरातील प्रमुख प्रतिबंधित भागांबाहेरही करोना रुग्णसंख्या वाढत चालल्याचे दिसत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोजच्या रोज मोठय़ा संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. सोमवारी बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडत ६२१० रुग्णसंख्येची नोंद झाली. मंगळवारी त्यात आणखी १५० नव्या रुग्णांची भर पडली आहे.

पुणे महापालिके चे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, संसर्ग आपल्याला होऊ नये याची पूर्ण खबरदारी नागरिकांनी स्वत: घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी मुखपट्टीचा वापर, वारंवार हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता हे नियम पाळणे आवश्यक आहे.

मात्र, करोना झाला म्हणजे मृत्यू येणार ही भीती बाळगू नये. मोठय़ा संख्येने रुग्ण रोजच्या रोज बरे होऊन घरी जात आहेत, ही बाब अत्यंत सकारात्मक आहे. त्यासाठी आजाराचे कोणतेही लक्षण दिसले की अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, वेळेत उपचार मिळाले असता आजाराला गंभीर होण्यापासून रोखणे शक्य आहे.