सासूच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या जावयाचा सासू आणि पत्नीने कट रचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीसह सासू आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश अशोक गोरखे असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी ज्योती आकाश गोरखे, मृताची सासू सोनी उमेश जेगरे, सासूचा प्रियकर अक्षय लोंढे, रामविजय महातो, साहिल संजय पंचराश, रवी राठोड यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पती चाळीसगाव येथे जात असल्याचं सांगून तो बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी ज्योतीने देहूरोड पोलिसात दिली. मृत आकाश हा सासुकडे पत्नीसह राहात होता. आकाशला सासूचे अनैतिक संबंध खटकत होते. त्याचा त्याला विरोध होता. तो पत्नी ज्योतिसह वेगळा राहणार होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आकाशची पत्नी ज्योती आणि सासू सोनी यांच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा, त्यांच्या बोलण्यात तफावत आढळली. त्यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला. मायलेकीला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच सासू सोनी हिने प्रियकरासोबत कट रचून जावयाचा खून केल्याचं पुढे आलं. या प्रकरणात पत्नी ज्योती देखील सहभागी होती.
३० जानेवारी रोजी पत्नी ज्योती आणि सासू सोनी यांनी आकाशला ठरल्या प्रकरणे देहूगाव येथील कमानीपाशी सोडलं. तिथून सोनी हिचा प्रियकर अक्षय लोंढे याने त्याच्या मित्रांसह आकाश ला एका मोटारीत बसवून बेदम मारहाण करून खून केला. त्याचा मृतदेह चिखली परिसरात ड्रेनेजमध्ये टाकून देण्यात आला अस पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.