पुणे : ‘गिरिप्रेमी’चे अनुभवी गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी शनिवारी पहाटे जगातील पाचवे सर्वोच्च शिखर मकालूवर (८,४८५ मीटर) यशस्वी चढाई केली. या यशामुळे आठ हजार मीटरवरील जगातील एकूण १४ शिखरांपैकी सात शिखरे गवारे यांनी सर केली असून, अशी कामगिरी करणारे ते पहिले महाराष्ट्रीय ठरले आहेत.
नेपाळ मधील मकालू हे शिखर चढाईसाठी अवघड मानले जाते. वेगाने वाहणारे अतिथंड वारे, उणे ३५ ते ४० अंश तापमान, सरळ रेषेतील अवघड चढाई यामुळे मकालूवर आजवर खूप कमी गिर्यारोहकांनी चढाई केलेली आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली गवारे यांनी गेल्या महिन्यापासून या शिखरावरील चढाईसाठी प्रयत्न सुरू केले होते. आज पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी हे शिखर सर करण्यात त्यांना यश आले.
हे शिखर नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. हिमालयाच्या महालंगूर भागात एव्हरेस्टपासून १९ किलोमीटर अंतरावर त्याचे स्थान आहे. चढाईसाठी प्रतिकूल अशी खडक – बर्फमिश्रित पर्वतभूमी आणि अत्यंत प्रतिकूल हवामान ही याची वैशिष्ट्ये आहेत.
जितेंद्र यांनी एव्हरेस्ट, कांचनजुंगा, ल्होत्से, धौलागिरी, मनासलू, अन्नपूर्णा-१ आणि आज मकालू अशा सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. ‘जितेंद्रची समर्पणाची भावना, नम्रता आणि शिस्त सदैव उल्लेखनीय राहिली आहे. त्यांचे यश महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे,’ असे झिरपे म्हणाले.