पुणे : भारतीय हवाईदल सध्या संपूर्ण स्वदेशीकरणाच्या मार्गावर आहे. लवकरच हवाईदलातील लढाऊ विमानांसाठी स्वदेशी बनावटीचे टायर आणि बॅटरी यांचाही वापर सुरू होणार असून त्यामुळे तब्बल ६०० कोटी रुपयांची बचत होणार आहे, असे मत हवाईदलाच्या देखरेख विभागाचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी मंगळवारी दिली.

भारतीय हवाईदलातर्फे पुण्यातील हवाईदलाच्या बेस रिपेअर डेपो येथे हवाईदलाच्या स्वदेशीकरणाबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हवाईदलाच्या देखरेख विभागाचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हवाईदलाच्या स्वदेशीकरणाबाबत विविध पैलूंवर यावेळी चर्चा झाली. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या (डीआरडीओ) विविध प्रयोगशाळांचे शास्त्रज्ञ तसेच हवाई दलाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि हवाई दलाशी संबंधित खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा Uddhav Thackeray vs Eknath Shinde in SC Live: शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

देशाच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणावर आधारित भारतीय हवाईदलाचे संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी प्रोत्साहन देणे आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृतीआराखडा तयार करणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता.

भारतीय हवाईदलाचा ताफा वैविध्यपूर्ण आणि विशाल आहे. त्यांच्या देखभालीसाठी मूळ उपकरण उत्पादकांवरील (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर) वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत पर्याय उभे करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. डीआरडीओ प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि हवाईदलाच्या क्षमता आणि कौशल्ये यावर एअर मार्शल पांडे यांनी यावेळी प्रकाश टाकला. हवाईदलाचे सामर्थ्य वाढवणे आणि स्वदेशीकरण करणे या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबरच विविध तांत्रिक पैलूंवर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.