Maratha Reservation Movement: पुणे : मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा, गृहखात्याला याची माहिती आहे, तर सर्वांनाच कळू द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करा. तसेच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विशेष अधिवेशन बोलावून २४ तासांत मान्यता द्या, असेही सुळे म्हणाल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पुणे शहरातील कसबा, टिळकवाडा या मानाच्या गणेश मंडळांसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढायचा असेल, तर सर्व पक्षांची चर्चा, मंत्रिमंडळाची बैठक आणि विशेष अधिवेशन बोलावून निर्णय होऊ शकतो.’
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी राजकीय पक्षांचे नेते रसद पुरवित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करावी. गृहखात्याला माहिती आहे, तर आम्हालाही कळू द्या. हे आंदोलन हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलन स्थळी स्वच्छतेसाठी राज्य सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे. आवश्यक ती स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.’
‘केंद्रात आणि राज्यात सलग अकरा वर्षे भाजपचे सरकार आहे. २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आरक्षणाबाबत भाषण केले होते. त्यामध्ये आरक्षण कसे देता येईल, याची सविस्तर माहिती दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१८ मध्ये आरक्षणाबाबत जे मांडले होते, त्याची अंमलबजावणी करावी. राज्यात सत्ता असतानाही छगन भुजबळ यांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागते, हे सरकारचे अपयश आहे,’ असे खासदार सुळे म्हणाल्या.
भाजपकडे बहुमत असतानाही केंद्रबिंदू शरद पवार का?
‘भारतीय जनता पक्षाकडे केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता आहे. ३०० खासदार, २५० आमदार असलेल्या महायुतीकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात. मग आंदोलनाचा केंद्रबिंदू शरद पवार का, अशी विचारणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष संपला. यांचे केवळ मूठभर खासदार, आमदार आहेत, असे म्हटले गेले. मग आता आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर आमच्यावर खापर कशाला फोडता? कोणताही मार्ग काढण्यासाठी यांना शरद पवार यांची गरज कशाला लागते,’ अशी विचारणादेखील खासदार सुळे यांनी केली.