पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरात सकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. यामागे त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या स्कूलबसचेही कारण आहे. त्यामुळे आयटी पार्क परिसरात जास्त रहदारीच्या वेळी स्कूलबससाठी स्वतंत्र मार्गिका द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज असोसिएशनने शासकीय यंत्रणांकडे केली आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी म्हटले आहे की, सूस परिसरात दोन मोठ्या शाळा आहेत. याचबरोबर इतरही काही छोट्या शाळा आहेत. या शाळांच्या बस रोज सकाळी आणि दुपारी रस्त्यावर विद्यार्थ्यांची ने-आण करतात. या बसची वाहतूक थोडी अनियंत्रित पद्धतीची आहे. त्यामुळे वाहनांना प्रवास करताना अडचणी येतात. हा परिसर हिंजवडीच्या टप्पा तीन या परिसराशी जोडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन राजीव गांधी इन्फोटेक पार्कसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचीही मोठी संख्या आहे. माझी प्रशासनास विनंती आहे की, शाळांच्या वाहनांसाठी सकाळी आणि दुपारच्या वेळी स्वतंत्र मार्गिक द्यावी. यामुळे वाहतूक आणखी सोपी व सुटसुटीत होईल.
फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज असोसिएशन महाराष्ट्रनेही स्कूलबसचा मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबबत फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने म्हणाले की, म्हाळुंगे रस्ता परिसरात अनेक मोठ्या शाळा आहेत. या शाळांच्या स्कूलबस मोठ्या प्रमाणात सकाळी रस्त्यावर असतात. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होते. शाळांची वेळ पुढेमागे केल्यास अथवा त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. याकडे शासकीय यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कोंडी नेमकी कशी होते…
आयटी पार्क परिसरातील रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. सकाळी गर्दीच्या वेळी अनेक स्कूलबस रस्त्यावर असतात. या स्कूलबस ठिकठिकाणी थांबत जातात. त्या थांबल्यानंतर रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. या कोंडीमुळे स्कूलबसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर होण्यासोबत रस्त्याने प्रवास करणाऱ्या रहिवाशांसह आयटी कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आयटी कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ या वाहतूक कोंडीत जात असल्याने त्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो.