पुणे : ‘सत्तर ते नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणारे हिंजवडीबाबत अनास्था का दाखवित आहेत? महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून दर आठवड्याला बैठक घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता बैठका का घेत नाहीत? असा सवाल करून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वारजे येथील कामाची पाहणी सुप्रिया सुळे यांनी बुधवारी केली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या कायम असून, त्या संदर्भातील मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे. आयटी पार्क पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. रस्त्यांची दूरवस्था, पावसामुळे निर्माण होणारा वाॅटर पार्क, वीज लपंडावामुळे हिंजवडी आयटी पार्कबाबत सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार सुळे म्हणाल्या, ‘हिंजवडी येथील विविध नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली आहे. आयटी पार्कमध्ये लाखो लोक येतात. हिंजवडीचा विषय हा राजकीय नाही. मात्र, सत्तर ते नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी सरकार एवढा खटाटोप करत आहेत. मात्र, हिंजवडीबाबत अनास्था का दाखविली जात आहे?’
वारजे परिसरातील महामार्गाच्या कामाबाबतही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘या कामासाठी महापालिका सहकार्य करत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. या कामाचा आढावा दर दोन ते अडीच महिन्यांनी घेतला जात आहे. त्यासाठी वाॅर रूम तयार केली आहे. भूसंपादनाअभावी कामाला विलंब होत आहे. जलसंपदा विभागाच्या काही जागा त्यासाठी घ्याव्या लागणार आहेत. महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री असताना दर आठवड्याला बैठक होत होती. अशी बैठक पुन्हा सुरू झाली तर चांगले होईल.’
आमदारच मारामाऱ्या करत असतील, तर कसे होणार ?
आमदार निवासातील उपाहारगृहामध्ये शिळे अन्न दिल्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी उपाहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्याबाबतची चित्रफीतही समाजमाध्यमातून प्रसारित होत आहे. यासंदर्भातही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पैसा आणि सत्तेची ही मस्ती आहे. देश कोणाच्याही मर्जीने चालत नाही आणि चालणारही नाही. आमदारच मारामाऱ्या करत असतील, तर कसे होणार?’