पुणे : राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या सुटत नसल्याने त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयन्सनी केली होती. याला स्थानिक ग्रामपंचायतींकडून विरोध दर्शविला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, हिंजवडी, माण-मारुंजी या भागातील ‘राजीव गांधी इन्फोटेक पार्क’ आणि परिसरात रस्ते, पाणी, वीज यांसह इतर पायाभूत सुविधांच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागासह जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकुम आणि लगतच्या जलद शहरीकरण होत असलेल्या भागांसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी. यामुळे एकात्मिक नियोजन, निधी व्यवस्था आणि सेवा पुरवठा यासाठी स्वायत्तता सुनिश्चित होईल. परिणामी नागरिकांना आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल, अशी मागणी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. याबाबत निर्णय होईपर्यंत शासकीय आस्थपनांशी समन्वय साधण्यासाठी एक सक्षम नोडल अधिकारी नेमण्याची आवश्यकता आहे. यामुळे नागरिक आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करु शकतील आणि त्यांना होणारा त्रास थांबेल. तरी माझी राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना विनंती आहे की कृपया याबाबत आपण गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे यांसह अनेक समस्या आहेत. आयटी पार्कची जबाबदारी विविध शासकीय यंत्रणांमध्ये विभागलेली आहे. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पिंपरी-चिंचवड महापालिका, स्थानिक ग्रामपंचायती अशा विविध शासकीय यंत्रणांचा समावेश आहे. या यंत्रणांमध्ये योग्य समन्वय नसल्याने आयटी पार्कमधील नागरी समस्या सुटण्याऐवजी त्यात भर पडते. यंदा पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांवर पाणी साचून त्याचे रूपांतर ‘वॉटर पार्क’मध्ये झाले. त्यामुळे आयटी पार्कचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयन्सनी केली होती.
ग्रामपंचायतींचा विरोध
या मागणीला आयटी पार्कमधील हिंजवडी, माण या स्थानिक ग्रामपंचायतींनी तीव्र विरोध दर्शविला होता. आयटी पार्कमधील समस्यांचा मुद्दा भरकटविला जात असल्याचा दावाही ग्रामपंचायतींनी केला होता. आयटी पार्क परिसरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा असल्याची त्यांची भूमिका होती. याचबरोबर आयटी पार्कमधील एमआयडीसीच्या हद्दीत नागरी सुविधांची समस्या गंभीर असून, ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्त्यांसह इतर सुविधा चांगल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
आयटीयन्सची मोहीम
आयटी पार्कमध्ये सुमारे पाच लाख आयटी कर्मचारी काम करतात. आयटी पार्कमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र संघटनेने केली होती. यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत २५ हजारांहून अधिक आयटीयन या मोहिमेत सहभागी झाले होते.