पुणे : चंदननगर भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए)  कारवाई करण्यात आली. गुंडाला वर्षभरासाठी बुलढाणा कारागृहात स्धानबद्ध करण्यात आले आहे.

आदिल इफ्तेकार सय्यद (वय २४, रा. वडगावशेरी) असे कारवाई केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी सय्यद याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. यात टोळी बनवून दमदाटी करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजविणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहे. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते.

चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे यांच्यामार्फत संबंधित प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर केला. सय्यद याची बुलढाणा कारागृहात करण्यात आली असून, त्याला वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने शहरातील शंभरहून अधिक गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.