स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलेलं पुणे शनिवारी हादरलं! पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने सर्व गोष्टींबाबत त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. आत्महत्येसाठी कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसल्याचे स्वप्निलने म्हटलं असून, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असं आवाहन केलं आहे.

संबंधित वृत्त- “मी घाबरलो, खचलो असं नाही,फक्त मी….”; MPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

मन हेलावून टाकणारं स्वप्निलचं पत्र…

MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.