महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पुरेसे पात्र उमेदवार मिळत नसल्यामुळे पदे रिक्त राहात आहेत, तर काही वेळेला कमी गुणांच्या उमेदवारांची नियुक्ती करण्याची वेळ येत आहे, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिले आहे.
किमान ३५ गुणांची पात्रतेची अट असूनही आयोगाला अनेक पदांसाठी पात्र उमेदवारच मिळालेले नाहीत. अभियंते आणि विधी विभागातील पदांसाठी उमेदवार मिळत नाहीत. गेली तीन वर्षे हीच परिस्थिती असल्यामुळे आयोगाला अनेक पदे रिक्त ठेवावी लागली आहेत. आयोगाला गेल्या अनेक परीक्षांमधून मुलाखतीसाठी जागांच्या तिप्पट उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे महिला व काही प्रवर्गाच्या जागा रिक्त ठेवण्याची वेळ आयोगावर आली होती. किमान ३५ गुण असलेले उमेदवारही मिळत नसल्याचे आणि ‘निगेटिव्ह मार्किंग’ असल्यामुळे तर ‘मायनस’ गुण असलेल्या उमेदवारांचीही नियुक्ती करण्याची वेळ आयोगावर येऊ घातली आहे. ही परिस्थिती आयोगाच्या अध्यक्षांनी पत्राद्वारे राज्यपालांपुढे मांडली आहे.
याच परिस्थितीवर तोडगा म्हणून आयोगाने मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करताना किमान पात्रतेसाठी पर्सेटाईलचे सूत्र अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.  खुल्या गटासाठी ३५ पर्सेटाईल, राखीव वर्गासाठी ३० पर्सेटाईल तसेच, खेळाडू व अपंगांसाठी २० पर्सेटाईल अशी किमान पात्रता ठरवण्यात आली आहे.