पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०१७ जिल्हा तांत्रिक सेवा या संवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदावरील निवडीसाठी ‘महाराष्ट्र शिक्षण सेवा’ आणि ‘जिल्हा तांत्रिक सेवा’ या दोन संवर्गांसाठी शासन परिपत्रकामध्ये स्वतंत्ररीत्या पदे निश्चित करण्यात आली आहेत. या दोन्ही संवर्गाची निकाल प्रकिया स्वतंत्र राबविण्यात येत आहे. त्यापैकी महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदासाठी शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा अंतिम निकाल एमपीएससीच्या संकेतस्थळावर ११ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. तसेच शिफारसपात्र उमेदवारांच्या शासनास शिफारशी करण्यात आल्या आहेत.
मात्र, या परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेप्रकरणी प्रकरणी २९ एप्रिल, २०२५ रोजीचे अंतिम आदेश आणि त्यानुसार शासनाकडून प्राप्त उमेदवारांची माहिती विचारात घेऊन ‘जिल्हा तांत्रिक सेवा’ या संवर्गासाठी निश्चित केलेल्या एकूण ९२ पदांपैकी ३९ उमेदवारांची शासनास शिफारस करण्यात येत आहे. या शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या निकालाच्या आधारे शिफारसपात्र ठरत असलेल्या उमेदवारांच्या शिफारशी संबंधित परीक्षेच्या अर्जातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना आणि अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. तसेच हा अंशतः निकाल सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात, न्यायाधिकरणांमध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल न्यायिक प्रकरणे निकाली निघाल्यानंतर त्या अनुषंगाने पारित आदेशानुसार उर्वरित ५३ पदांचा निकाल जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.