पुणे : देशभरात एक ते दीड लाख लहान मुले थॅलेसेमियाग्रस्त असून, दर वर्षी जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये १० ते १५ हजार मुले या विकारासह जन्माला येतात. देशात ४ कोटी २० लाखांहून अधिक जण बीटा थॅलेसेमिया वाहक असून, त्यांच्यापासून पुढील पिढीत हा आनुवांशिकरीत्या जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज् ऑफ इंडिया (फॉग्सी) या संस्थेने मुक्ता प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत थॅलेसेमियासाठी गर्भवतींची प्रसूतिपूर्व तपासणी, प्रतिबंध आणि निदान याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

फॉग्सी आणि वेहा फाउंडेशनच्या वतीने मुक्ता प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. याचबरोबर देशव्यापी पातळीवर थॅलेसेमियाबाबत जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. फॉग्सी आणि वेहा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि मुक्ता प्रकल्पाच्या राष्ट्रीय संयोजक डॉ. पूजा लोढा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या प्रकल्पाअंतर्गत देशभरात गर्भवतीची प्रसूतिपूर्व थॅलेसेमिया चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत रक्त चाचणीद्वारे थॅलेसेमियाचे निदान केले जाते. त्याचबरोबर दोन्ही पालक थॅलेसेमियाचे वाहक असल्यास त्यांचे समुपदेशन करून जन्माला येणारे मूल थॅलेसेमियाग्रस्त असण्याचा धोका समजावून सांगितला जातो. तसेच ते मूल जन्माला न घालता गर्भपात करण्याचा सल्ला दिला जातो. यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे मुक्ता प्रकल्पामध्ये देशातील १० शहरांमध्ये या वर्षाअखेरपर्यंत डॉक्टरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याचबरोबर तीसहून अधिक शहरांमध्ये जनजागृती मोहीम आणि परिषदांचे आयोजन केले जाणार आहे.

थॅलेसेमियाबद्दल जनजागृती करून त्याचा प्रतिबंध करणे, हा मुक्ता प्रकल्पाचा उद्देश आहे. यात वैद्यकीय महाविद्यालये, निदान केंद्रे आणि डॉक्टरांना सहभागी करून घेतले जाईल. या माध्यमातून पुढील पिढीला थॅलेसेमियामुक्त करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहेत. – रुमाना हमीद, संचालक, वेहा फाउंडेशन.

मुक्ता प्रकल्पात सुरुवातीच्या टप्प्यात ७० ते ८० डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाईल. हे डॉक्टर पुढे मार्गदर्शक म्हणून काम करतील आणि इतर डॉक्टरांना प्रशिक्षित करतील. थॅलेसेमियाबाबत जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे डॉक्टरांना योग्य पद्धतीने निर्णय घेण्यास मदत होईल. – डॉ. पूजा लोढा, राष्ट्रीय संयोजक, मुक्ता प्रकल्प.