पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. या पावसामुळे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर ५०८ खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी ८५५ खड्डे होते. त्यामुळे एकूण १ हजार ३५६ खड्डे शहरात आढळले आहेत. त्यापैकी ८४८ खड्डे बुजविण्यात आले असून, ५०८ खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. पावसाळा सुरू हाेण्यापूर्वी शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ८५५ खड्डे आढळले होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली. सलग पाच दिवस दररोज पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. या पावसामुळे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर ५०१ खड्डे पडल्याचे महापालिकेच्या पाहणीत दिसले.

निगडी, आकुर्डी, भोसरी, सांगवी, वाकड, थेरगाव, चिखली या परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना खड्यातून वाट काढावी लागत आहे. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होतात. त्यामुळे खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतूकही संथ गतीने होत असून, कोंडीत भर पडत आहे.

एकूण १ हजार ३५६ खड्यांपैकी ८४८ खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामध्ये डांबर आणि काेल्ड मिक्सने ४४४, बीबीएम म्हणजे खडीने ३६, पेव्हिंग ब्लाॅकने २८८, तर सिंमेंट-काँक्रीटने ४२ खड्डे पूर्णत: बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५०८ खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे उपअभियंता अश्लेष चव्हाण यांनी सांगितले.

ठेकेदाराकडून खड्डे बुजवून घेणार

खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे ‘ॲप’ विकसित करण्यात आले. खड्ड्यांची ॲपमध्ये नोंद होत आहे. एखाद्या ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास ॲपमध्ये दिसेल. किरकोळ कामाला एक वर्ष, डांबरी रस्त्याला तीन आणि सिमेंट रस्त्याला पाच वर्षे दोषदायित्व निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते ठेकेदाराकडून बुजवून घेण्यात येणार आहेत.

प्रभाग – एकूण खड्डे – बुजविलेले खड्डे – बुजवायचे राहिलेले खड्डे

अ – ११५ – ३९ – ७६

ब – २९० – २२० – ६३

क – १५१ – ११३ – ३८

ड – १३९ – ७२ – ६७

इ – १०४ – ९१ – ५३

फ – १८५ – ६८ – ११७

ग – ५० – ०७ – ३९

ह – २९१ – २५१ – ४०

प्रकल्प – ३५ – २७ – १०

एकूण – १,३५६ – ८४८ – ५०८

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. खड्यांची ॲपमध्ये नोंद होत आहे. त्यामुळे एखाद्या जागेवर दुसऱ्यांदा खड्डे पडल्यास ठेकेदाराकडून बुजवून घेण्यात येणार आहे.-मकरंद निकम,शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने प्रशासनाने युद्धपातळीवर खड्डे बुजवून घ्यावेत. पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. – अमित गावडे, माजी नगरसेवक