पुणे : ‘महापालिकेच्या निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातून सामोरे जायचे, की प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाचे प्रमुख नेते घेतील. ग्रामपंचायतीपासून मुंबई महापालिकेपर्यंत कितीही आघाड्या झाल्या, तरी राज्यात महायुतीची सत्ता येणारच आहे,’ असे शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी पुणे शहर शिवसेना कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी संवाद साधला. शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या की स्वतंत्र याची घोषणा पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा कोणीही केली, तरी त्याला फारसे महत्त्व नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

सामंत म्हणाले, ‘आगामी महापालिका निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू आहे. सभासद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि पक्षातील पदे लवकरच दिली जातील. पुण्यात आमच्या पक्षात गटातटाचे कोणतेही राजकारण होणार नाही. ग्रामपंचायतीपासून मुंबई महापालिकेपर्यंत कितीही आघाड्या झाल्या, तरी राज्यात महायुतीची सत्ता येणारच आहे.’

‘महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत हरकती, सूचना नोंदविण्यात आल्या असून, त्याची दखल घेतली जाईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना (शिंदे) पक्षाचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले. या मेळाव्याला लाखो शिवसैनिकांची उपस्थिती असेल. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या शैलीमुळे मेळाव्याला मोठी गर्दी होईल, त्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘राज ठाकरे महायुतीत आले तर आनंदच’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘राज ठाकरे यांना पाच वेळा भेटलो आहे. तर, उद्धव ठाकरे चार वेळा भेटले आहेत. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते आमच्याबरोबर आले, तर आनंदच आहे. खासदार संजय राऊत काय बोलतात याला फार महत्त्व देऊ नका.’