डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी फार काळ थांबता येणार नाही. पोलिसांना काही दिवसांचीच मुदत देणार असून तपास लागला नाही तर प्रश्न प्रतिष्ठेचा न करता गुन्ह्य़ाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे सूतोवाच राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी केले. त्यासाठी सीबीआयशी बोलून त्यांना लागेल ती राज्य सरकारकडून मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला पाच महिने होत आले तरी आरोपींचा माग लागलेला नाही. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंबईतील प्रीती राठी हल्ला प्रकरणी आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्य़ातही अनेक दिवसांपासून आरोपींचा माग सुरु होता, पण आरोपी सापडत नव्हते. अखेर त्यांना आज अटक करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणीही पोलीस स्वस्थ बसलेले नाहीत. या गुन्ह्य़ाचा तपास लवकर लागावा, असे जनमत आहे. मात्र, आता आम्हालाही फार काळ थांबता येणार नाही. आता पोलिसांना काही दिवसांचीच मुदत देणार आहे. हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता आवश्यकता पडल्यास सीबीआयशी बोलणी केली जाईल. त्यांना राज्य सरकारकडून हवी ती मदत दिली जाईल. सतीश शेट्टी प्रकरणी सीबीआयने काही पोलिसांची नावे घेतली आहेत. त्याबाबत पाटील यांनी सांगितले की, तपासात अडथळा आणणाऱ्या आणि दोषी पोलिसांची नावे सीबीआयने आम्हाला दिली तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.
लोकसभेचे उमेदवार पवारच ठरवतील
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातून तुमचे नाव घेतले जात असल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, आमचे नेते पवारसाहेब हेच लोकसभेला कोण उभे राहील यावर शिक्कामोर्तब करतील. त्यांनी सांगितल्यानंतर ती व्यक्ती निवडणुकीला उभी राहील, असे पाटील म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाची टोलबाबत दुटप्पी भूमिका
अलीकडे प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जात आहे. भाजपाचे शासन होते त्या वेळी आम्ही टोलला विरोध केला, त्या वेळी नितीन गडकरी यांनी विधानसभेत टोलचे महत्त्व सांगितले होते. आमचा विरोध झुगारून टोल सुरु केले होते. भाजपचे शासन असलेल्या राज्यात टोल बंद आहे का, असा प्रश्न विचारत सर्व राज्यांना धोरणे सारखीच आहेत, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.

More Stories onसीबीआयCBI
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder case of dr dabholkar might be taken by cbi r r patil
First published on: 18-01-2014 at 03:05 IST