राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मृतावस्थेत सापडलेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शना आणि तिचा मित्र राजगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. दर्शनाचा मित्र पसार झाला असून त्याने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पसार झालेल्या मित्राचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
एमपीएससी परीक्षेत दर्शना दत्ता पवार (वय २६, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली होती.
हेही वाचा >>> धक्कादायक: MPSC उत्तीर्ण केलेल्या दर्शना पवारचा राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह
पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ९ जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हांडोरे होता. १२ जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ परिसरात दर्शनाचा मृतदेह सापडला.
हेही वाचा >>> पुणे: झोका खेळताना गळफास बसून बालिकेचा मृत्यू
दर्शनाच्या मित्राचा शोध सुरू दर्शना आणि तिचा मित्र राहुल हांडोरे १२ जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हाॅटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून माहिती उपलब्ध झाली आहे. दर्शनाचा मित्र राहुल पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दर्शनाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे.