पिंपरी : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवार (२५ जून) आणि गुरुवारी (२६ जून) आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात संगीत महोत्सव आयोजिला आहे. या दोन दिवसीय महोत्सवात नामवंत गायकांचे गायन रसिकांना ऐकायला मिळणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांच्या ‘तालयात्रा’ या विशेष कार्यक्रमाने बुधवारी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा ‘मंगलदीप’ हा कार्यक्रम होईल. संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू होईल. गायक रामेश्वर डांगे व गायिका स्मिता देशमुख यांचे शास्त्रीय गायन, तर गायक मिलिंद दलाल यांच्या सुगम गायनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता प्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.