शहराध्यक्ष म्हणतात – अकिल मुजावर, एमआयएम

* निवडणुकीची तयारी काय आहे?

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एमआयएम’चे वातावरण अतिशय चांगले आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणून ‘पतंग’ चिन्हास मान्यता मिळालेली आहे. सर्वच जागा लढवण्याचा विचार नाही. ३२ पैकी १३ प्रभाग लढवणार आहोत, त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. ‘एमआयएम’कडून उमेदवारी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आहे. उमेदवारांची पहिली यादी २५ जानेवारीनंतर जाहीर करण्याचा प्रयत्न राहील.

* आघाडीचा विचार आहे का?

काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा शिवसेना-भाजप अशा कोणत्याही मोठय़ा राजकीय पक्षांशी एमआयएम समझोता, आघाडी-युती, असे काहीही करणार नाही. मात्र, समविचारी पक्षांशी आघाडी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आनंदराज आंबेडकर, डॉ. सुरेश माने यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय, प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा होणार आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच जाहीर करणार आहोत. इतर पक्षांतील नेते ‘एमआयएम’च्या संपर्कात आहेत. योग्य वेळी ते पक्षात प्रवेश करणार आहेत.

* निवडणूक मुद्दे काय असतील?

शहरातील विकासाचे दावे फोल आहेत. अनेक प्रश्न जसेच्या तसे आहेत. शिक्षण, आरोग्य, झोपडपट्टी पुनर्वसनाचे फक्त कागदी घोडे नाचवण्यात येत असून, नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल अशा मोजक्या नेत्यांच्या भागातच कामे झाली आहेत. शहरातील ठराविक भाग चकचकीत दिसून येतो. इतर भागापर्यंत विकासाची कामे पोहोचलीच नाहीत. या सर्व गोष्टींसह पालिकेतील भ्रष्ट कारभाराचा भंडाफोड करण्यात येणार आहे.

* ‘एमआयएम’ मुस्लिमांचाच पक्ष आहे का?

‘एमआयएम’ हा केवळ मुस्लिमांचा पक्ष नसून सर्व जाती, धर्माचे कार्यकर्ते पक्षात आहेत. राज्याच्या अनेक भागांत दलित व बहुजन समाजाच्या उमेदवारांना ‘एमआयएम’ने संधी दिली आहे. जे निवडून आले आहेत, असे लोकप्रतिनिधी ‘स्टार’ प्रचारक म्हणून पिंपरीत प्रचारासाठी येणार आहेत. पिंपरी पालिका निवडणुकीतही सर्वधर्मीय उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. मुस्लीम समाजाचे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे अनुत्तरित आहेत. शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेक वर्षांपासून समाजाचे मूळ प्रश्न सुटू शकले नाही. कारण, मतांच्या राजकारणात समाजाची दिशाभूल झाली आहे. मुस्लीम समाजाचे नेते म्हणवणारे नुकतेच भाजपमध्ये गेले. त्यामागे समाजाचे कोणतेही हित नव्हते. त्यांच्या स्वार्थासाठी ते तिकडे गेले. आधी ते काँग्रेस व राष्ट्रवादीत होते, मात्र त्यांनी समाजासाठी काहीही केले नाही.

(मुलाखत- बाळासाहेब जवळकर)