पुण्यात मुठा कालवा फुटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागाला अक्षरश: पुराचे स्वरुप आले आहे. याठिकाणी असलेल्या जनता वसाहतीचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असंख्य लोकांची घरे या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांनी याठिकाणी भेट दिली. पालिकेने पाटबंधारे खात्याला वारंवार या कालव्याच्या भिंती धोकादायक असल्याचे सांगितले होते. मात्र पाटबंधारे विभागाकडून योग्य ती दखल घेण्यात आली नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असे त्या म्हणाल्या. आता या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.

सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास अचानक पाणी यायला लागल्याने दांडेकर पूल आणि जनता वसाहत या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये एकच घबराट पसरली. खडकवासला धरणातून कालव्यात होणारा विसर्ग थांबवण्यात आला असून नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे. परिसरातील नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचेही टिळक यांनी सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येणार असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापौरांनी या भागाला भेट दिली तेव्हा येथील संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला. टिळक यांना धक्काबुक्की करत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. मते मागायला येता मात्र अडचणीच्या वेळी कोणीही लक्ष देत नाही असा आरोप येथील महिला करत होत्या. यावेळी घरे वाहून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. घटना घडली तरीही संबंधित यंत्रणा याठिकाणी वेळेत दाखल झाल्या नाहीत असा आरोपही येथील नागरिकांनी केला.