लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कौटुंबिक वादातून सराइताने वहिनीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावातील डोंगराजवळ पुरला. मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपीने घरी येऊन मटण पार्टी केली. अखेर या गुन्ह्याला वाचा फुटली असून, याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका सराइताला अटक केली.

गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१, रा. परंदवाडी, शिरगाव, ता. वडगाव मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील एका गुन्ह्यात चव्हाण पसार झाला होता. त्याने शिरगाव परंदवाडी येथे त्याची भावजय सुनंदा चव्हाण हिचा भाऊ लक्ष्मण चव्हाण याच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावाजवळ असलेल्या डोंगरात नेला. तेथे खड्डा खोदून मृतदेह पुरला. थंड डोक्याने खून केल्यानंतर गणेश आणि त्याचा भाऊ लक्ष्मण घरी आले. त्यांनी घरी मटण तयार करून पार्टी केली. भावजयीचा खून केल्यानंतर पसार असलेला आरोपी गणेश नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक अजित फरांदे यांना मिळाली.

आणखी वाचा-पुणे : निवासी डॉक्टरांच्या लढ्याला यश! सरकारने उचलली तातडीने पावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणीकंद परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सापळा लावून त्याला पकडले. चौकशीत त्याने भावजयीचा खून केल्याची कबुली दिली. त्याला तपासासाठी परंदवाडी पोलीस चौकीतील उपनिरीक्षक तपासधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या ताब्यात देण्यात आले. गणेशविरुद्द चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (माेक्का) कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो पसार झाला होता. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, किरण पड्याळ, अजित फरांदे, प्रतिक्षा पानसरे यांनी ही कारवाई केली.